फैजपूर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मंगळवारी फैजपूर येथे सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फैजपूर ता.यावल परिसरातील केळी पिकावरील कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) बाधीत क्षेत्राची आज पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली व सी. एम. व्ही. चे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. हंबर्डी गावातील शेतकरी विलास चुडामण पाटील, न्हावी येथील शेतकरी सागर निळकंठ फिरके, निर्मला निळकंठ फिरके व आमोदा येथील शेतकरी दिलीप लिलाधर कोल्हे यांच्या केळी पिकाखालील बाधीत क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
या क्षेत्रभेटी वेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल तालुका कृषी अधिकारी बी. व्ही. वारे, फैजपूर मंडळ कृषी अधिकारी सागर सिनारे, कृषी व महसूल विभागातील सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.