मुलीच्या आत्महत्येनंतर दुसरी घटना, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हा अनुरक्षा व परिरक्षण गृह (रिमांड होम) आता मुलांसाठी सुरक्षित नाही की काय असे चित्र आता दिसू लागले आहे. दीड महिन्यापूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेतील पीडित हा एरंडोल वसतिगृहातील पीडित असून येथे देखील त्याचे दुर्दैव त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी आता रिमांड होमचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी लक्ष घालतील काय असा सवाल पालकांमध्ये निर्माण झाला आहे.
एरंडोल येथील खाजगी वसतिगृहामध्ये तेथील काळजीवाहकानेच काही मुले आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार गुन्हादेखील दाखल झालेला आहे. दरम्यान यातील एक १० वर्ष ९ महिने वयाचा पीडित बालक हा बालसुधारगृह रिमांड होम येथे दाखल आहे. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास रिमांड होम येथीलच दाखल १३ वर्षे ७ महिने वयाचा दुसरा बालक याने त्याला धमकी व दमदाटी करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
यामुळे घाबरलेल्या पीडित बालकाने ही घटना लवकर सांगितली नाही. मात्र घटनेची माहिती कळल्यावर रिमांड होम येथील कर्मचारी रविकिरण वालजी अहिरराव (वय ४० वर्षे) यांच्या फिर्यादीवरून बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी १३ वर्षीय बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी मीरा देशमुख करीत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे रिमांड होम येथील प्रकारांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बालसुधारगृहाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याकडे लक्ष देतील काय असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे.