भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीसाठी साकेगाव- जोगलखेडा रस्त्यावर गस्तीवर असलेले मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या संयुक्त पथकाने वाळुचोरीच्या संशयावरून वाहन थांबवले असता, वाहन चालक मजुरांसह पळून गेला. वाहनात अंदाजे २ ब्रास वाळू होती. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन ते तहसील कार्यलय आवारात जमा केले.
या वाहनाद्वारे अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने पथकाने साकेगाव ग्रामस्थांच्या मदतीने संबंधीत वाहन तहसील कार्यलय आवारात जमा केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू माफियांविरुद्ध कंबर कसल्याने सध्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. शनिवारी ता. ९ रोजी एक वाहनातून अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक केली जात होती. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखालील संयुक्त पथक जोगलखेडा भागात वाघुर नदीपात्रातुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीसाठी गस्तीवर होते. त्यावेळी साकेगाव- जोगलखेडा रस्त्यावर मनोज परदेशी (रा. साकेगाव) यांच्या मालकीचे वाहन (एमएच १९, जे ३९५१) साकेगावच्या दिशेने येत होते. वाहन चालकाने पथक दिसताच वाहन रस्त्यावर थांबून मजुरासह पळून गेला.
त्यानंतर तहसिलदारांच्या माहितीवरून घटनास्थळी तत्काळ पोलीस मदत पाठवून वाहन तपासले असता त्यात वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार वाहन व वाहनतील गौण खनीजाचा पंचनामा केला असता, वाहनात अंदाजे २ ब्रास वाळू होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन ताब्यात घेऊन साकेगाव ग्रामस्थांच्या मदतीने ते तहसील कार्यलय आवारात जमा केले असून, अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) प्रमाणे दंडात्मक कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. मंडळ अधिकारी योगिता पाटील (कुऱ्हे), तलाठी जयश्री पाटील (सुनसगाव), तलाठी साधना खुळे (शिंदी), कोतवाल जितेश चौधरी (साकेगाव) यांच्या पथकाने ही कारवाई केली.