जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील आव्हाणे शिवारातील कचरा फॅक्टरीजवळ सुरत रेल्वेलाईनजवळ धरणगाव तालुक्यातील एका तरुणाने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती सोमवार दि. ११ रोजी दुपारी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश करीत हंबरडा फोडला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
पवन राजेंद्र बाविस्कर (वय २२, रा. आव्हानी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आव्हानी गावात आई व लहान भावासोबत राहतो. छत्रपती संभाजीनगर येथील शिवराज महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगावात आला होता. पूर्वी जैन कंपनीत तो कामाला जायचा.
जळगाव तालुक्यातील आव्हाना शिवारात सुरत रेल्वे लाईनजवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याने कुठल्यातरी नैराश्याखाली येऊन रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.