एसटी महामंडळाच्या अधिकारी, वाहकांना सूचना
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयाच्या चलनात असलेल्या नोटा दि. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने देखील त्यांच्या अधिकारी, कर्मचारी, वाहकांना सूचना निर्गमित केल्या आहेत. केवळ बुधवार दि. २८ सप्टेंबर पर्यंतच २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्या असे निर्देश दिलेले आहेत.
सदर २००० रुपयाच्या नोटा शनिवार दि. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंतच वैध चलन म्हणून चलनात राहतील, अशा भारतीय रिजर्व बँकेच्या सूचना आहेत. त्यामुळे महामंडळाकडे जमा होणाऱ्या रु .२००० च्या चलनी नोटा दि. ३० सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी बँकेत जमा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता बुधवार दिनांक २८ च्या मध्यरात्री पर्यंतच रु.२००० नोटा स्विकारल्या जाव्यात, असे परिपत्रकात एसटी महामंडळाने म्हटले आहे.
दि. २८ पर्यंत संकलन झालेल्या रु. २००० च्या नोटा लगेच दुस-या दिवशी दि. २९ पर्यंत त्या आगारातील संबंधित बँक खात्यात जमा करण्यात याव्यात. दि. २८ च्या मध्यरात्री नंतर कोणत्याही परिस्थितीत रु.२००० च्या नोटा स्विकारल्या जाणार नाही याची नोंद प्रकर्षांने घेण्यात यावी. याकरीता सर्व विभाग नियंत्रक यांनी अधिनस्थ आगार पातळीवर सदरच्या सुचना प्रसारित करुन त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून घ्यावी. तरी सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याअनुषंगाने उचित कार्यवाही करावी. सदरच्या सूचना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय यांच्या मान्यतेने प्रसारीत करण्यात येत आहेत, असेही परिपत्रकात नमूद आहे.