जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचे रूग्ण भारतात आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक झाले आहे. जळगावात डेंग्यूची साथ पसरल्यानंतर वेळीच उपाययोजना न केल्याने अनेकांचा जीव गेला होता. परंतु कोरोना व्हायरस शहरात येवूच नये यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या दालनात महापौर भारती सोनवणे यांनी गुरूवारी सकाळी 11 वाजता बैठक घेतली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त मिनानाथ दंडवते, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा उगले, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा.बाबा नाखले, आरोग्यदूत अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी कोरोना व्हायरसचे जिल्ह्यात कुठेही संशयित रूग्ण नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रूग्णालयात महिला व पुरूषांचे दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय रूग्णालयातील घन कचरा दररोज घेवून जाण्यासाठी मनपाने घंटागाडी पाठविण्याची विनंती केली असता महापौरांनी तात्काळ त्याबाबत सूचना दिल्या. उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी जिल्हा रूग्णालय आवारातील कर्मचारी योग्य पध्दतीने स्वच्छता करीत नसल्याची बाब निर्देशनास आणून दिली असता अधिष्ठाता यांनी मक्तेदाराला सूचना देण्याचे सांगितले.
जनजागृतीसाठी बॅनर लावणार
शहरात मनपा प्रशासनाकडून कोरोना व्हायरसपासून बचावासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय नागरिकांना माहिती होण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. त्यात मुख्यत्वे बसस्थानक, रेल्वेस्थानक, मार्केट परिसर आणि महाविद्यालयांचा समावेश करण्याचेही त्यांनी सुचविले. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय करावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.