पर्यटन स्थळांचा विकास निधी मिळण्यासाठी “डीपीआर” तयार करा
जिल्हाधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश
सविस्तर वाचा कोणती आहेत, पर्यटनस्थळे…
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात पर्यटन विकास अलीकडे होणेस सुरुवात झालेली असून याद्वारे जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या महत्वाच्या अनुषंगाने पर्यटनास चालना मिळून जिल्ह्यात रोजगार निर्मिती व आवश्यक विकास होणेस मदत होणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत शासन स्तरावरून निधी मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात काही निवडक महत्वाची पर्यटन स्थळे आहेत. त्यासाठी जिल्हा पर्यटन विकास आराखडा (डीपीआर) तयार करणेकामीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. इतरही काही महत्वाच्या पर्यटन स्थळांच्या विकासाचा जिल्हा पर्यटन विकास आराखडा शासनास सादर करायचा आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे अधीन राहून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन२०२३-२४ अंतर्गत मुल्यमापन, नियंत्रण डाटा एंट्री या योजनेमधून जिल्हा पर्यटन विकास आराखडा तयार करणेकामीचा प्रस्ताव सादर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांना निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी काही निवडक पर्यटन स्थळ पत्रात नमूद केले आहेत. त्यात पाटणादेवी व गणित नगरी, चाळीसगाव, पद्मालय, ता. एरंडोल, मंगळग्रह मंदिर, अमळनेर, शिव सृष्टी (झिरो म्युझीयम) चाळीसगाव, मेहरुण तलाव, जळगाव, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील पर्यटनांतर्गत सुरु असलेली विविध विकास कामे, ता. जामनेर, चांगदेव मंदिर, चांगदेव ता. मुक्ताईनगर, मनुदेवी ता पावल, फरकांडे येथील झुलते मनोरे ता. एरंडोल, उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे, ता. चोपडा, कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक, आसोदा, बालकवी ठोंबरे स्मारक, धरणगाव यांचा समावेश आहे.