यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील न्हावी शिवारामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका विहिरीमध्ये पाच वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला होता.याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता या बालिकेला तिच्या पित्यानेच विहिरीत फेकून देण्याची व खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता ठूशा बारेला (वय-५, रा. न्हावी ता.यावल) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. ठुश्या भावला बारेला (वय-३०, रा. गुलझीरी ता.झिरण्या जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश) हा सध्या यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील सुनील नामदेव फिरके यांच्या शेतात वास्तव्याला आहे. त्यांची पाच वर्षाची चिमुकली कन्या अनिता बारेला ही नेहमी आजारी राहत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेण्याचे ठुश्या बारेला याला सांगितले होते. दरम्यान १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी ठुश्या बारेला याने मुलगी अनिता बारेला हिला दवाखान्यात घेऊन जात असल्याचे सांगून सोबत नेले.
त्यानंतर न्हावी शिवारातील धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत ढकलून जीवे ठार मारले. घटना घडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी चौकशी केली असता मयत चिमुकलीचे वडील संशयित आरोपी ठुश्या बारेला यानेच तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात संशयित आरोपी ठूश्या बारेला याला पोलिसांनी अटक केली आहे.
मयत चिमुकलीची आजी छंडा वारला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ठुश्या भावला बारेला याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.