पारोळा शहरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) – शहरातील बूधनाथ मठाजवळ भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्याच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पेंढारपुर ता. पारोळा येथील परमेश्वर संतोष महाजन (वय ४२)यांनी नेहमीप्रमाणे बाजारपेठेतील हातगाडीवर भाजीपाला विक्रीचे दुकान लावले होते. शनिवारी दुपारपासुन रिमझिम पाऊस सुरु होता. संध्याकाळी भाजीपाला विकण्यासाठी ते बसले होते. अचानक मेन विजेच्या तारच्या भाग मधुनच तुटून परमेश्वर महाजन यांच्या अंगावर पडला. यावेळी नागरिकांनी धाव घेत काठीने तार बाजुला सारली. यावेळी परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला.
दरम्यान घटना घडल्यानंतर परमेश्वर महाजन यांना खाजगी डॉक्टरांकडे दाखवण्यात आले. मात्र त्यांना उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे नेण्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. घटनेची पारोळा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.