पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस हवालदारांना तात्पुरत्या स्वरूपात पोलीस उपनिरीक्षक किंवा फौजदार या संवर्गात तर २८५ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. याबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी नुकतेच काढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवा जेष्ठतेनुसार भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याच्या आस्थापनेवरील ३३ हवालदारांना १४ ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात अटीशर्तींच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे ते पोलीस उपनिरीक्षक किंवा फौजदार झाले आहे. तसेच २८५ नाईक हे पोलीस हवालदार झाले आहेत.