जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
सुरुवातीला ध्वजस्तंभाचे पूजन करून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी अध्ययनात उत्तम प्रगती करीत असून संशोधनाच्या पातळीवर देखील सर्वोत्कृष्ट ठरत आहेत. तसेच, विविध स्पर्धेत भाग घेऊन घेऊन स्वतःसह महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवीत आहेत. रुग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार आता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, थायरॉईड तपासण्या, डिजिटल एक्सरे देखील रुग्णालयात सुरु झाले आहे. रुग्णालयात काही अंशी मनुष्यबळाची कमतरता भासत असली तरीही आपण सांघिक कामगिरीच्या बळावर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कायम प्रयत्नरत असतो, असे डॉ गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
प्रसंगी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या तसेच राज्यस्तरावरील विविध स्पर्धेतील यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच, अंतिम वर्षाच्या निकालात महाविद्यालयातून प्रथम तीन आलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले.