भाजपाची पुन्हा फजिती, महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब
जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नगरसेवकांचे नेत्यांनीच सोमवारी कान उपटल्यावर मंगळवारी महासभेत आणखी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भाजपसह एमआयएम, शिवसेनेच्या शिंदे, ठाकरे गटाच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यानीच महासभेत येणे टाळले. त्यामुळे कोरम अभावी सभा अनिश्चित काळासाठी महापौरांना तहकूब करावी लागली आहे. त्यामुळे पुढील महासभेत हा प्रस्ताव परत येऊ शकतो. भाजपसाठी हि मोठी नामुष्की ठरली आहे. भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे १ नगरसेवक उपस्थित होते.
महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेला सकाळी ११ वाजेपासून मनपा आयुक्त डॉ. विदया गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होत्या. सव्वा अकरा वाजता महापौर जयश्री महाजन ह्या व्यासपीठावर आल्या तर, उपमहापौर कुलभूषण पाटील हे १ वाजून २० मिनिटांनी व्यासपीठावर आले. त्यानंतर सभेच्या कामाकाजाला सुरुवात करण्यात यावी, अशी सुचना नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी केली. परंतु सभा चालविण्यासाठी किमान २४ नरसेवकांचा कोरम पूर्ण असणे गरजेचे होते. मात्र, सभेच्या ठिकाणी फक्त चार नगरसेवक व एक स्विकृत नगरसेवक उपस्थित असल्यामुळे ही सभा अनिश्चित वेळेसाठी तहकुब करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अश्विन सोनवणे यांनीच केली.
त्यास नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आपला लेखी खूलासा सादर करीत माझा लेखी खुलासा स्वीकारून त्याची इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, असे सांगितले. त्यानुसार महापौर जयश्री महाजन यांनी सभा अनिश्चित वेळेसाठी तहकुब करून आयुक्तांचा लेखी खुलासाची इतिवृत्तात नोंद घेण्याची सूचना केली. या बैठकीला नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, ॲड.शुचिता हाडा, रजनी अत्तरदे, ज्योती चव्हाण, स्वीकृत महेश चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.