मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या नियोजनात जिल्हा प्रशासन पास
जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे येथे शासकीय कार्यक्रमाला जात असताना त्यांचे विमान खराब हवामानामुळे जळगाव विमानतळावर दुपारी उतरविण्यात आले. पुढील प्रवासाची व्यवस्था झाल्यानंतर ते धुळे येथे कारने रवाना झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला ‘प्लॅन बी’ म्हणून आधीच पूर्वकल्पना असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे केलेले नियोजन यशस्वी झाले.
“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानाने निघाले होते. दरम्यान खराब हवामानामुळे त्यांचे विमान दुपारी २. १५ वाजता जळगावात उतरले. तसेच, धुळे येथे विमानतळ नाही. मुख्यमंत्र्यांना धुळ्यात उतरण्यासाठी तांत्रिकदृष्टया अडचण येऊ नये याकरिता जळगाव येथे विमानतळावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उतरू शकतात याबाबत “प्लॅन बी” म्हणून जिल्हा प्रशासनाला कल्पना देण्यात आलेली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वेळेवर नियोजन करून ठेवले होते.
दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तत्काळ धुळे येथे जाण्याबाबत व्यवस्था झाल्यावर दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे धुळे येथे कार्यक्रमाला रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जिल्हा बँक व्हाईस चेअरमन अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. मात्र दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते अनुपस्थित होते.