जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बांधकाम व्यवसायिकाला प्रीपेड टास्क, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी दहा लाख ४१ हजारांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २८ जून ते ४ जुलै दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील सौरभ शरद जोशी (२८, रा. प्लॉट क्र. ५२, रामदास कॉलनी) हे बांधकाम व्यवसायिक आहे. त्यांच्या व्हाटसअॅप व टेलीग्राम अॅपवर २८ जून ते ४ जुलै दरम्यान सोशल मिडीयाच्या माध्यमातून भामट्यांनी वारंवार संपर्क साधला. जोशी यांना प्रीपेड व क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. या भामट्यांनी जोशी यांना जाळ्यात ओढत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
भामट्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जोशी यांनी आठ दिवसात दहा लाख ४१ हजार रुपये जमा केले. मात्र, पैसे परत मिळत नसल्याचे पाहून जोशी यांनी सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधत फसवणुकीची तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. डी. जगताप करत आहेत.