जळगाव (प्रतिनिधी) – अलार्म चेन ओढणे, बेकायदेशीर तिकीट बाळगणे, अनधिकृत फेरीवाले आणि मद्य व तंबाखूजन्य पदार्थांसह प्रवास करणार्यांवर कडक रेल्वेच्या आरपीएफने मे महिन्यात कडक कारवाई केली आहे. मध्य रेल्वे विभागात २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड विनाकारण साखळी ओढल्याबद्दल वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे आरपीएफने मे महिन्यात अलार्म चेन पुलिंग, बेकायदेशीर तिकीट, अनधिकृत फेरी आणि मद्य व तंबाखूजन्य पदार्थांसह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि दंड आकारून कठोर कारवाई केली आहे. यात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये अनधिकृत अलार्म चेन ओढणेप्रकरणी ९४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली. ७११ व्यक्तींना अटक करण्यात आली आणि रु.२ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये, बेकायदेशीर तिकिटांची ४९ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि ५२दलालांवर कारवाई करण्यात आली. कायद्याच्या कलम १४४(१) अंतर्गत अनधिकृत फेरीवाले यांची २७४१ प्रकरणे नोंदवण्यात आली. २७२९ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून १७ लाख २७ हजार ५८० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैध दारूच्या १ लक्ष १९ हजार ६८० रुपयांच्या ३६३ बाटल्या जप्त करून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
याशिवाय ६४ किलो वजनाची आणि ८४ हजार रुपये किमतीची अवैध तंबाखू उत्पादनांची १४ पाकिटे जप्त करण्यात आली. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, इतरांना गैरसोय होण्याच्या अनावश्यक कारणांसाठी विनाकारण साखळी ओढू नका. अनधिकृत एजंट, दलाल यांच्याकडून तिकिटे खरेदी करू नका. अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन देऊ नका. ट्रेनमध्ये दारू, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाऊ नका. योग्य तिकीट मिळवा आणि सन्मानाने प्रवास करा, असेही मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे कळविण्यात आले आहे.