जळगावात सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : सायबर गुन्हेगारांनी चक्क जळगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. चंद्रकांत गवळी यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत चंद्रकांत गवळी यांच्या नावाने पैशांची मागणी करीत असल्याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कुठलीही शहानिशा केल्याशिवाय माझ्या सोशल मीडियामधील अकाउंटला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी “केसरीराज” च्या माध्यमातून केले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील (वय ३६, रा. नवीन पोलीस कॉलनी) यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे फिर्याद दाखल केली आहे. २८ मार्चपासून आजपावेतो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. तसेच त्याद्वारे पैशांची मागणी करीत आहे.
त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे सायबर पोलीस स्टेशनला ७ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत. दरम्यान नागरिकांनी माझ्या फेसबुक व इतर सोशल मीडिया अकाउंटची खात्री केल्याशिवाय प्रतिसाद देऊ नका. सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी “केसरीराज” च्या माध्यमातून केले आहे.