यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील एका वाहनचालकाचा गळा चिरून व दगडाचे ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आली आहे. भिमराव शंकर सोनवणे (वय-६०) रा. किनगाव बुद्रुक ता. यावल असे मृत वृध्दाचे नाव आहे. यावल पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
भिमराव सोनवणे हे यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे मुलगा व सुन यांच्यासोबत राहायला होते. खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने गळ्यावर वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना किनगाव – चुंचाळे रस्त्यावरील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी २४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे, पोलीस पथक हे घटनस्थळी दाखल झाले आहे. यावेळी मृतदेहाचा पंचानामा करण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी श्वानपथक घटनास्थळी आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेबाबत मयताचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.