जळगाव (प्रतिनिधी) – निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याच्या प्रकरणात तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात अॅड. प्रवीण चव्हाण यांना रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी चाळीसगावातून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना संध्याकाळी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
मविप्र संस्थेतील वादाच्या प्रकरणात अॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे येथील कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसांच्या पथकाने निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी संशयितांनी कट रचून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती दिली होती. तसेच निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि. ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती.
भोईटे यांच्या या तक्रारीवरुन अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली होती.
रविवारी चाळीसगाव येथे अॅड. प्रवीण चव्हाण आले असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव पोलिसांना लागली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपक बिरारी, पीएसआय सुहास पाटील, पोना भूषण पाटील, पोकॉ निलेश पाटील, रवींद्र बच्छे, विनोद खैरनार, ज्ञानेश्वर गीते, नितेश पाटील आदींच्या पथकाने तातडीने अॅड. प्रवीण चव्हाण यांना चाळीसगावातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जळगाव शहर पोलीस स्थानकात संध्याकाळी ६ वाजता आणले.
त्यानुसार शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या पथकाकडून अॅड. प्रवीण चव्हाण यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीतून काय समोर येते, अॅड. प्रवीण चव्हाण यांना अटक होते काय याकडे जळगाववासियांचे लक्ष लागून आहे.