जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील नवीन बसस्थानकात बसच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बुधवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पंडित लोटू सोनवणे (वय-५०) हे आपल्या पत्नी व मुलगा यांच्यासह खेडी कडोली येथे राहायला आहे. शेती करून आपला घरखर्च चालवितात. त्यांची पत्नी भारती यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भारती यांच्या बहीण त्यांना पाहण्यासाठी आल्या होत्या. भारती यांच्या बहिणीला सोडण्यासाठी पती पंडित सोनवणे हे नवीन बस स्थानक येथे गेले. सायंकाळी 5 वाजता सुमारास त्यांचे मेहुणी यांना बसमध्ये बसवल्यानंतर पायी जात असताना त्यांना मागून बस (एमएच २० बीएल २४२१) आणि (एमएच ४० एन ९१०६) या दोन बसमध्ये दबले गेले त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बुधवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.