जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र.दे. इंदीरानगर येथे दोन महिन्याच्या चिमुकलीचे रुमालाने तोंड दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी फरार आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र.दे. इंदीरानगर येथे सोनु कोळी (ठाकरे) या राहतात. 12 ऑक्टोबरच्या रात्री अंदाजे दोन वाजेच्या सुमारास अरविंद कैलास पाटील (वय ४०) हा त्यांच्या घरात अचानक आला. सोनु कोळी यांची पत्नी सौ. शोभना सोनु कोळी यांना त्याने कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.
सौ. शोभना कोळी यांच्या दोन महिने वयाच्या मुलीचे खिशातील रुमालाने तोंड दाबून तिला ठार केले. या घटनेनंतर तो पळून गेला. याबाबत सौ. शोभना कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पाचोरा उप विभागीय अधिकारी भारत काकडे, स.पो.नि. विष्णू आव्हाड यांनी भेट दिली. पुढील तपास स.पो.नि.विष्णू आव्हाड करत आहे. आरोपीस अद्याप अटक नाही.