नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – जम्मू-कश्मीरच्या कुलगाम भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
सुरक्षा दलांना कुलगाम येथील अहवाटू परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, सैन्य दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तरित्या एक शोधमोहीम सुरू केली. जेव्हा सुरक्षा दलांची पथकं संशयित ठिकाणावर पोहोचली, तेव्हाच दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला.
सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. त्या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावं मोहम्मद शफी गनी आणि मोहम्मद आसिफ वानी उर्फ यावर अशी आहेत. हे दोघंही अनुक्रमे बटपोरा आणि टाकिया गोपालपोराचे रहिवासी असून ते जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. त्यांनी आधीही सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर हल्ले केले होते.
तत्पूर्वी सोमवारी देखील कुलगाममध्ये जम्मू-कश्मीर पोलीस आणि सैन्य तसंच सीआरपीएफसह केलेल्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. या दोन्ही घटनांमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.