जळगाव (प्रतिनिधी) – खोटे नगर परिसरातील हिरागौरी पार्क येथील अपार्टमेंटमधील बंद घर फोडून १ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
गोविंदा हिलाल पाटील (वय-४१) रा. हिरागौरी पार्क, निमखेडी शिवार जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. विमा प्रतिनिधी म्हणून ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान ते घर बंद करून बाहेर गेलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. गोविंदा पाटील हे रात्री ८ वाजता घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.