जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे तडकाफडकी निलंबन करीत असल्याचे आदेश नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी रात्री उशिरा काढले आहे. एका समाजाविषयी आक्षेपार्ह बोलणे बकाले यांना चांगलेच भोवले असून त्यांची चौकशी देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका व्यक्तीशी फोनवर बोलत असताना एका समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तींनी आणि संस्थांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली होती. तातडीने निलंबन करा अशी त्यांची मागणी होती. यामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्याची बदली न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ही दिला होता.
या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी त्यास निलंबित करण्यासह खातीनिहाय चौकशी लावतो असे आश्वासन दिले होते. आता रात्रीतून, त्यांचे निलंबन पूर्ण झाले असून त्याची चौकशी देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.