जळगाव (प्रतिनिधी) – कांताई बंधाऱ्याजवळ नागाई जोगाई मंदिर परिसरात गिरणा नदी पात्रात फिरायला गेलेल्या तरुणांपैकी एक तरुण रविवारी ११ सप्टेंबर रोजी बुडाल्यामुळे बेपत्ता झाला होता. तब्बल २४ तासानंतर त्याचा मृतदेह नदीच्या पात्रामधून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथील दूध फेडरेशन जवळ असलेल्या मिथिला सोसायटी येथील १२ ते १४ तरुण हे सहलीसाठी कांताई बंधारा जवळ असलेल्या नागाई जोगाई मंदिर परिसरातील गिरणा नदीच्या पात्राजवळ रविवारी ११ रोजी गेले होते. या ठिकाणी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फोटो काढण्यासाठी योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४), समीक्षा विपिन शिरोडकर (वय १७), नयन योगेश निंबाळकर (वय १७) हे नदीच्या काठाजवळ गेले होते. त्या ठिकाणी फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. ते पाहून उपस्थित इतर तरुणांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. यावेळी योगिता, सागर आणि समीक्षा या तरुणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र नयन निंबाळकर हा वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. त्याचा शोध घेता तो मिळून आला नव्हता. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासन त्याचा शोध घेत होते.
सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या पात्रातच नयन निंबाळकर यांचा मृतदेह आढळून आला. त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले आहे. या ठिकाणी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला असून नातेवाईकांची खूप मोठी गर्दी झाली आहे. तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील कार्यवाही करीत आहेत.
नयन याच्या पश्चात आई-वडील बहिण असा परिवार आहे. त्याचे वडील जळगाव दूध विकास संघात कर्मचारी आहे.