चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील गणेश विसर्जन करताना १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास येथे घडली असून याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सौरव शत्रुघ्न मोरे (वय १७ ) असे या मुलाचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातील सौरव शत्रुघ्न मोरे हा गणेश विसर्जनासाठी तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गेला होता . त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बुडू लागल्याने दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणार्या कामगारांनी धाव घेत सौरवला बाहेर काढले . मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सौरभच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परीवार आहे.