पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरासह ग्रामीण भागात हर घर तिरंगा मोहीम मोठ्या उत्साहात घरांवर तिरंगा फडकवून साजरा करण्यात येत आहे. त्यातच प्रभाग क्र. २ मध्ये माजी नगरसेविका अंजली पाटील, भैय्या चौधरी यांनी आपल्या प्रभागात घरोघरी जावून मोफत तिरंगा वाटप करून प्रभागातील सर्वच
घरांवर तिरंगा फडकविण्यात यशस्वी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार आपल्या प्रभागातील प्रत्येक घरांवर तिरंगा फडकला पाहिजे. या भावनेतून देशभक्तीने भारावलेल्या माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अंजली पाटील व नगरसेवक भैय्या चौधरी यांनी स्वतः प्रभागातील प्रत्येक घरी जावून मोफत १५०० तिरंगांचे वितरण केले. परिणामी प्रभागातील जवळपास सर्वच घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान सुरू झाले असून माजी नगराध्यक्ष करण पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग २ मध्ये आम्ही मोफत तिरंगा घरोघरी वाटप केले. जवळपास प्रभागातील सर्वच घरावर तिरंगा डौलाने फडकत असून प्रभागात चैतन्य निर्माण झाले आहे. अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका सौ. अंजली करण पाटील यांनी दिली.
हर घर तिरंगा मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रभागातील प्रत्येक घरी जावून तिरंग्याचे मोफत वितरण केले होते. व सर्वांना तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले होते. प्रभागातील जवळपास सर्वच घरांवर अर्थात १५०० घरांवर तिरंगा फडकविण्यात यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया माजी नगरसवेक भैय्या चौधरी यांनी दिली.