जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील रसलपूर येथील आश्रमशाळेतील ९ वर्षीय विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिकदृष्ट्या पाहता या विद्यार्थ्याला फिट आल्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
रुपेश बारेला (वय ९, रा. अहिरवाडी ता. रावेर) हा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून रसलपूर येथील निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. यंदा तो तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे. सोमवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी त्याने आंघोळ केल्यानंतर त्याला काही वेळाने उलटी व शौचास झाली. त्यानंतर त्याची अचानक तब्येत खालावली, त्याला झटके येऊ लागल्याने तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, अशी माहिती आश्रमशाळेचे अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
रावेर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून जळगाव सामान्य रुग्णालयात नेण्याचे सांगितले. जळगावात आणत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला, अशी माहितीहि विजय पाटील यांनी दिली. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता त्याला तपासून सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले.
मयत रुपेश बारेला याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. रुपेशचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रुपेशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु होती. घटनेमुळे रुपेशच्या आई वडिलांवर शोककळा पसरली आहे.