पाचोरा ( प्रतिनिधी ) – क्रिडा क्रांती कबड्डी मंडळातर्फे आयोजित “आमदार चषक” खुली पुरुष गट जिल्हा कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना महर्षी वाल्मिकी संघ जळगाव व महर्षी फाऊंडेशन संघ, जळगांव या संघांमध्ये रंगला. या सामन्यातनिर्धारित वेळेत दोन्ही संघांचे समान गुण असल्याने शेवटी “सुपर – ८” च्या माध्यमातून महर्षी फाऊंडेशन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सामना जिंकला.
महर्षी वाल्मिकी संघास द्वितीय स्थानावर तर आॅर्डन्सस फॅक्टरी वरणगाव संघास तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
मानसिंगका काॅर्नर रिक्षा स्टाॅपजवळ २० फेब्रुवारीपासुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त क्रिडा क्रांती कबड्डी मंडळातर्फे “आमदार चषक – २०२२” खुली पुरुष गट जिल्हा कबड्डी असोसिएशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेत्या संघास आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे २१ हजार व चषक, उपविजेत्या संघास नगरसेवक भुषण वाघ यांच्यातर्फे संघास ११ हजार रुपये व चषक व तृतीय क्रमांकाच्या संघास पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांच्यातर्फे ७ हजार रुपये व चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील) यांच्यातर्फे जाहिर करण्यात आले होते.
या कबड्डी स्पर्धेत एरंडोल, पाचोरा, जळगांव, भुसावळ, आॅर्डन्सस फॅक्टरी वरणगाव येथील ११ संघांनी सहभाग नोंदविला होता. तीनही संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख अलेक्झांडर मनी, पंच चैतराम पवार, सुनिल राणे, नयनसागर मनी, आनंद महांगडे, अनिल कोळी, रोशन पाटील, कमलेश पाटील, सुरेश महाजन, विनय चौधरी, शकील शेख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक वाजिद बागवान, बंटी कासार, लक्ष्मण पाटील, योगेश खैरनार, प्रशांत सोनवणे, धनराज पाटील, सचिन नरवाडे, जितेंद्र पाटील (मेजर), अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.