भुसावळ ( प्रतिनिधी ) – चार गावठी पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुसे घेऊन जाणार्या मध्यप्रदेशातील आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे.
दीपसिंह गुरुमुखसिंग कलानी (२०, रा. तितरान्या, जि.खरगोन, मध्य प्रदेश) हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन भुसावळात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला. रात्री १० वाजेच्या सुमारास दीपसिंग हा रेल्वे संग्रहालय परिसरात अंधारात उभा दिसला. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पळ काढला. मात्र, पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली. त्याच्याजवळ चार गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस व रोख ८५० रुपये मिळून १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे. बाजारपेठ पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.