हिंगणघाट (वृत्तसंस्था) – एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी अर्थात ९ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर अंतिम निकाल न्यायालयाने आजसाठी राखून ठेवला होता. आज न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३ फेब्रुवारी २०१९ला त्याला अटक करण्यात आली होती. पण या दोन वर्षांच्या कालावधीची त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मरेपर्यंत जन्मठेप असा जन्मठेपेचा अर्थ होत असल्यामुळे आणि विकेश नगराळेच्या गुन्ह्याचं क्रौर्य पाहून त्याला २ वर्षांची सूट मिळणार नाही. शिवाय त्याला ५ हजारांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे”, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.