कुऱ्हाड बु” ते म्हसास रस्त्यावरील घटना
पाचोरा(प्रतिनिधी)- मुलीची प्रसूती झाली असल्याने तिला भेटण्यासाठी जळगाव येथे दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना कुऱ्हाड बुद्रुक ते म्हसास या रस्त्याच्या दरम्यान काल सायंकाळी घडली.
याबाबत अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिल शांताराम चौधरी (वय – ४६) असे मयताचे नाव आहे. अनिल चौधरी यांच्या मुलीची प्रसूती झाली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुऱ्हाड बु” ते म्हसास दुचाकीने जात असतांना बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.
यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषीत केले. मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अनिल चौधरी हे नामांकित पहेलवान होते. ते शेती व्यवसाय करुन गुरांचा व्यापार करीत होते. गेल्या वर्षीच त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. मयताचे पश्चात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.