जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या अँड रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या ६ आरोपींवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली .
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पुढे सांगितले की , काल रात्री ९ वाजेच्या सुमारास चांगदेवहून मुक्ताईनगरकडे जात असताना अँड रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला करण्यात आला . हल्लेखोर ३ दुचाक्या घेऊन आलेले होते . त्यांनी लोखंडी रॉडने या कारची पुढची काच फोडली आणि बॉनेटवर वार केले . एका आरोपीने पिस्तूल रोखल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . या आरोपींच्या विरोधात भा द वि कलम ३०७ , शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम ३/२५ आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . छोटू भोई , सुनील पाटील व पंकज कोळी अशी ३ आरोपींची नावे या फिर्यादीमध्ये नमूद आहेत अन्य ३ आरोपी अज्ञात आहेत . अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही . पोलिसांचा तपास सुरु आहे . हे आरोपी शिवसेना पक्षाशी निगडित आहेत हे सर्वश्रुत आहे , असेही ते म्हणाले .