जळगाव ( प्रतिनिधी ) – हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा १२ डिसेंबररोजी जळगावात सत्कार करण्यात येणार आहे . या सत्कार सोहळ्याचे संयोजक जिल्हा सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज या आयोजनाची माहिती दिली .
राज्य सरपंच परिषदेची जळगाव जिल्हा कार्यकारिणीने प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ ठाकरे यांच्या सूचनेवरून या सत्कार सोहळ्याचे जळगावात आयोजन केले आहे . येत्या १२ डिसेंबररोजी आदित्य लॉन्स येथे दुपारी १२ वाजता या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हिवरे बाजारचे ३२ वर्षे सरपंच राहिलेले पद्मश्री पोपटराव पवारांचा सत्कार केला जाणार आहे . माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत . या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील , खासदार रक्षा खडसे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत . या सत्कार सोहळ्यानंतर जिल्ह्यातील सरपंचांना संघटित करण्याच्या हेतूने सरपंचांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे . राज्यातील सरपंचांच्या हक्कांसाठी लढणारी राज्य सरपंच परिषद ही संघटना आहे.