कोईम्बतूर ( वृत्तसंस्था ) – तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११ वर गेला आहे संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत माहिती देणार असून त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील हलचाली आता वाढल्या आहेत. डिजीपींना घटनास्थळी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत.
हेलिकॉप्टर अपघाताच्या पाहणीसाठी वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी घटनास्थळी जाणार आहेत.वायुसेनाप्रमुख अपघातस्थळी जाऊन अपघात कसा झाला याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे.
माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.