जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातून गुरे चोरून वाहतूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे . पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल तिरंगाजवळ पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत २४ नोव्हेंबररोजी पोलीसांनी गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. संशयितांनी जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, धुळे, मनमाड अशा १४ ठिकाणांहून गुरे चोरी केल्याचे कबुल केले. नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातील ३० ठिकाणी गुरांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच संशयितांमध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे. सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांनी विविध ठिकाणाहून चोरलेली ३३ गुरांची विक्री मालेगाव येथे केली होती. पोलीसांनी सर्व गुरे ताब्यात घेतली गुन्ह्यातील वाहन ( क्रमांक एमएच ०३ एएच २६९४ ) टाटा सुमो ताब्यात घेतले आहे.
सपोनि रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे, पोउनि लोकेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पो.ना. नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांतीलाल पगारे, भूपेश वंजारी, शांताराम पवार, प्रेमसिंग राठोड, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, कैलास पाटील, लालसिंग पावरा, दिनेश पाटील, भगवान पाटील, संदीप माने, पोहेकॉ ओंकार सुतार, भगवान माळी, जयंत सपकाळे, शंकज जंगाळे, दत्तू महाजन, राजेंद्र पाटील, प्रविण सपकाळे, अनिल आगोणे, मनोहर पाटील यांनी ही कारवाई केली.