अ भा क्षत्रीय अहिर शिंपी समाज संघटनेच्या पत्रपरिषदेत तपशील मांडला

जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापसाचे व्यापारी स्वप्नील शिंपी यांची हत्या त्यांचा कामगार मित्र दिलीप चौधरी यानेच सुपारी देऊन घडवून आणलेली आहे , असा संशय आज पत्रपरिषदेत त्यांचे वडील रत्नाकर शिंपी यांनी व्यक्त केला . अ भा क्षत्रीय अहिर शिंपी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या पत्रपरिषदेत अनेक अनुत्तरित प्रश्नांची जंत्री मांडण्यात आली .
स्वप्नील शिंपी हत्याकांड ; घटनास्थळ फोटो

जिल्हा पत्रकार भवन येथे अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष रविंद्र बागुल , स्वप्नील शिंपी यांचे वडील रत्नाकर शिंपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रपरिषदेत माहिती देताना सांगितले की , ज्यावेळी आणि ज्या ठिकाणी हे हत्याकांड घडले त्यावेळी स्वप्नील शिंपी यांच्यासोबत कारमध्ये त्यांचा कामगार मित्र दिलीप चौधरी पण होता . या हत्याकांडाच्या ठिकाणी झालेल्या झटापटीत दिलीप चौधरीला साधे खरचटलेलेही नाही . त्याची सगळीच वर्तणूक संशयास्पद वाटते आहे . या हत्याकांडाचा योग्य तपास होऊन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे . पोलीस आणि प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास आमची संघटना राज्यभर आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे . आम्ही अजून पोलिसांना भेटलो नाही . काल आम्ही माहिती मिळवली , स्वप्नील शिंपी यांच्या कुटुंबियांना भेटलो . पालकमंत्र्यांच्या घरी विवाह सोहळ्यात अनेक मंत्री येणार असल्याने आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक प्रोटोकॉलनुसार त्यांच्या व्यवस्थेत आहेत असे समजल्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी उद्या जाणार आहोत . या गुन्हयात ३०२ कलम लावले जावे अशी आमची मागणी आहे मात्र नेमकी कलमांची माहिती घेऊन आम्ही पोलिसांशी चर्चा करणार आहोत . पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही आम्ही भेटणार आहोत . संशयित दिलीप चौधरी हा आधी शिंपी यांच्याकडे हेल्पर होता . मैत्रीचे संबंध असल्याने त्याला शिंपी पिता आणि पुत्र नेहमी सांभाळून घेत होते मध्यंतरी त्याने २ – ३ व्यवहारात अनियमितता केल्याने त्याच्याकडील काही जबाबदारी काढून त्याला दुसरे काम देण्यात आले होते . ही अनियमितता स्पष्टही झाली होती . केवळ १५ -१६ वर्षांची मैत्री म्हणून त्याला या पिता पुत्रांनी दूर केलेले नव्हते . मात्र कालांतराने दिलीप चौधरीला असे वाटायला लागले होते की आपण हा व्यवसाय स्वतंत्रपणे सांभाळू शकतो आणि त्यासाठी शिंपी यांच्याशी आपल्याला स्पर्धा करावी लागेल . या स्पर्धेच्या विचारात शिंपी यांचा अडसर दूर करण्यासाठी त्याने त्यांचा काटा काढला असावा असा संशय घेण्यास भरपूर वाव आहे .
स्वप्नील शिंपी हत्याकांड ; घटनास्थळ फोटो


कारण त्यादिवशी या दोघांजवळ १५ लाख २८ हजार ४५० रुपये रोकड असलेली पिशवी होती . त्यांना आर क्रांती नावाच्या व्यापाऱ्याकडून ७ लाख ६० हजार रुपये आणि रजनीकांत नावाच्या व्यापाऱ्याकडून ७ लाख ६८ हजार ४५० रुपये मिळाले होते . आता त्या पिशवीत फक्त १० लाख २८ हजार ४५० रुपये शिल्लक दिसत आहेत , बाकीचे पाच लाख रुपये कुठे गेले हाही प्रश्न अनुत्तरित आहे . आमचा तर असा आरोप आहे की , शिंपी यांच्या हत्येची सुपारी मारेकऱ्यांना दिलीप चौधरी यानेच दिली असावी , आणि ते मिळून न आलेले साडे चार लाख रुपये त्यानेच त्या मारेकऱ्यांना जागेवर वाटून दिले असावेत . स्वप्नील त्या दिवशी कार चालवत होता तर मग त्याच्या शरीराच्या डाव्या भागावर वार कसे झाले ? या झटापटीत दिलीप चौधरी याने मारेकऱ्यांचा प्रतिकार का केला नाही ? त्याने प्रतिकार केला असता तर त्याला साधारण तरी जखमा झाल्या असत्या , त्याला साधे खरचटलेलेही दिसत नाही , असे का ? , असे आमचे प्रश्न आम्ही पोलिसांना सांगणार आहोत . शवविच्छेदनानंतर स्वप्नील यांचे पार्थिव गावी आणले तेंव्हा दिलीप यांच्या वर्तणुकीचा संशय बऱ्याच लोकांना आला होता . हल्ला करून मारेकरी निघून गेल्यावर ड्रायव्हिंग येत असूनपण दिलीप रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ का घालवत बसला ? , तो आपल्याच कारमध्ये टाकून तात्काळ स्वप्नीलला रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता पण त्याने तसे का केले नाही ? हल्ला होत असताना मारेकऱ्यांच्या मोटारसायकलींचे क्रमांक टिपून घेणे किंवा फोटो काढणे दिलीपला का जमले नाही ? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत . हा खून पैशांसाठी झाला नाही , ठरवून त्यांची हत्या झाली आहे . दिलीप चौधरी यांचे पोलिसांनी गेल्या २ महिन्यातील मोबाइल डिटेल्स तपासावेत अशी आमची मागणी आहे , असेही ते म्हणाले .
अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल , मयत स्वप्नीलचे वडील रत्नाकर शिंपी , संजय खैरनार, मनोज भंडारकर, राजेंद्र सोनवणे, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कापूरे, संजय जगताप, शिवाजी शिंपी, जयंत कन्नडकर, रत्नाकर शिंपी, सुरेश सोनवणे, अनिल खैरनार, युवाध्यक्ष प्रमोद शिंपी, राजेश खैरनार, दिलीप भांडारकर, सुरेश कापुरे, बंडूनाना शिंपी, संजय इसई, अनिल मांडगे, मनोज जगदाळे आदी उपस्थित होते.







