जळगाव ( प्रतिनिधी ) – त्रिपुरातील घटनेनंतर मालेगाव, वाशिम, नांदेड व अमरावती जिल्ह्यात आंदोलनास गालबोट लागले. या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आज शांतता समितीची बैठक बोलावली. पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात आयोजीत बैठकीत उपस्थितांना शांतता राखण्याचे आवाहन व कायदा हातात घेणार्यांवर काठोर कारवाईचे संकेत देण्यात आले
जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रविवारी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्याचे आदेश दिले.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य अनिल अडकमोल, सैय्यद अय्याज अली नियाज अली यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला शहरातील सर्व पोलीस निरिक्षक तसेच शांतता समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शनिपेठचे पो नि बळीराम हिरे यांनी केले.समिती सदस्यांच्या विविध मुद्यांवर पोलीस अधीक्षकांनी उत्तरे दिली
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, व्हॉटसऍप, फेसबुक, इन्टाग्रामसह इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोणी भडकावित असेल तर त्याचा प्रयत्न हाणून पाडा. वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घ्या. अनुचित प्रकार घडू नये म्हणूून सर्वधर्मिय सदस्यांनी काळजी घ्यावी कुणी काही अनुचित प्रकार करत असेल, किंवा भावना भडकावित असेल तर पोलिसांना कळवा, कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.