मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्याच्या काही भागात पुढील ३ दिवसांत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पुढचे चार दिवस पावसाचे सावट आहे.
दक्षिण कोकणात काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणातल्या काही भागात कालही पावसाने हजेरी लावली होती.
सध्या लक्षद्विप आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यासह 12 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक,आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
उद्या पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पुणे, रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.