जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या 20 तसेच एका पालकाचा मृत्यू झालेल्या 359 अनाथ बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून अनाथ मुलांच्या मागे शासन “आधारवड” म्हणून खंबीरपणे उभे आहे “मिशन वात्सल्य अंतर्गत” अनाथ मुले व विधवा महिलांना योजनांचा लाभ व शासकीय नोकरीत १ % आरक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते . यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आ.चंद्रकांत पाटील, आ.संजय सावकारे उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 20 बालकांना प्रत्येकी 5 लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांना दरमहा 1100 रुपये मिळणार असून त्यांना शासकीय नोकरीत 1 % आरक्षण मिळणार आहे. सज्ञान झाल्यावर या मुला मुलींना व्याजासह रक्कम मिळणार आहे.
कोविड काळामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील 337 महिलांना अकाली वैधव्य आले. या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात आहे. या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनाथ मुले व विधवा महिलांसाठी तत्पर राहण्याच्या सूचनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या
या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार चंद्रकांत पाटील, संजय सावकारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, ऍड प्रदीप पाटील, आय डी बी आय चे व्यवस्थापक विशाल भालेराव, महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, पर्यविक्षाधीन अधिकारी संजय पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांच्यासह महिला बाल विकासाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले. आभार योगेश मुक्कावार यांनी मानले.







