धरणगाव (प्रतिनिधी) – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने आज शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याचे सांगण्यात आले कारवाई सुरु असून पोलीस स्थानकात आल्यावर सर्व माहिती देऊ, असे पथकातील कर्मचाऱ्याने सांगितले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडालीय.
शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य येणार असल्याची गुप्त माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली होती. चार जणांच्या पथकाने दुपारी कमल जिनिंगमध्ये अचानक धाड टाकली. गहू आणि तांदूळची पोती आढळून आल्याचे कळतेय. या पथकाने महसूलच्या अधिकाऱ्यांना माहिती देत बोलावून घेतले. त्यानुसार धरणगाव तहसीलमधून एक अधिकारी घटनास्थळी गेले. परंतू पोलीस कारवाईबाबत कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे पंचनामा करण्यास असमर्थता दर्शवित वरिष्ठांना कळविण्याचे सांगितले. घटनास्थळी दोन रिक्षातही धान्यसाठा आढळून आल्याचे सांगण्यात आले

पोलिसांनी जप्त केलेला साठा रेशनचा आहे की, खाजगी ? याची माहिती मिळविण्यासाठी सॅम्पल लॅबला पाठवण्यात येणार असल्याचेही कळते. धरणगाव पोलिसात अद्याप कुठलीही नोंद नाही. धाडीच्या ठिकाणी नुकतेच पो नि शंकर शेवाळे, सपोनि गणेश अहिरे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले.







