जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) मास्कचा वापर , सोशल डिस्टन्सींगचे पालन , थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर 7 ऑक्टोबपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 65 वर्षे वयावरील नागरिक, को-मार्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षे वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती , संस्था , संघटनासह येणारे नागरिक व कामगार यांनी कोविड-19 ची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता दक्षता घ्यावी.
गर्दी होऊ नये याकरीता कमीत कमी 6 फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करावी, प्रत्येक नागरिक, भेट देणारे व्यक्तीना मास्कचा वापर अनिवार्य राहील, त्याशिवाय प्रवेश देऊ नये, साबणाने हात धुवावेत (40-60 सेंकद पर्यंत) हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, (कमीत कमी 20 सेंकद), खोकतांना व शिंकतांना तोंड व नाक झाकणे, आजाराबाबत राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
धार्मिक स्थळांच्या प्रवेशाव्दारावर हात धुण्याची व्यवस्था करावी थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे, लक्षणे नसलेल्या व्यक्तीनाच प्रवेश द्यावा , मास्क लावलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा, कोविड-19 विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक ठळक दिसतील अशा ठिकाणी लावण्यात यावेत, उपाययोजनांबाबत श्रवणीय किंवा चित्रफीतव्दारे प्रसारण करण्यात यावे, अभ्यांगतांना प्रवेश टप्याटप्प्याने देण्यात यावा, लोकांच्या येण्याच्या वेळा आणि संख्या निश्चित करावी
पादत्राणे स्वत:च्या वाहनांमध्ये ठेवण्यात यावेत. आवश्यकतेनुसार पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्ररित्या व्यवस्था करण्यात यावी, वाहनतळांच्या ठिकाणी व आवारात गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन व्यवस्थापन करण्यात यावे, बाहेरील आवारात असलेले शॉप्स, स्टॉल्स, च्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.
दर्शन घेण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन रागेत उभे राहण्यासाठी 6 फुट अंतर ठेवण्यात यावे, अभ्यांगतांसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाबाबत व्यवस्था करण्यात यावी, रांगेमध्ये उभे राहतांना दोन भाविकांमध्ये 6 फुट अंतर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील, वातानुकुलीत आवारात तापमान हे 24-30 अंश से. सेट करण्यात यावे , मुर्ती , पुतळा , पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध राहील, शारिरीक संपर्क टाळण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा देणे व अभिवादन करण्यास प्रतिबंध राहील,धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणतेही अर्पण उदा. प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी बाबी प्रतिबंधीत राहतील, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार/कर्मचारी यांना कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य असणे आवश्यक आहे. कामगार यांची कामावर हजर होण्यापूर्वी तसेच आठवडयातून कोविड-19 चाचणी करणे आवश्यक राहील, याबाबतचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक राहील.
धार्मिक स्थळांच्या परिसरात कोविड संशयीत रुग्ण आढळून आल्यास अशा व्यक्तीस स्वतंत्र खोलीमध्ये किंवा इतर लोकांपासून विलगीकरण करावे, अशा रुग्णाची माहिती तात्काळ जवळच्या कोविड केअर रुग्णालयास कळविण्यात यावी. या आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.