एरंडोल ( प्रतिनिधी ) – दोन दिवसांतील पावसामुळे अंजनी धरण पूर्ण भरल्याने धरणारून पुढे नदी पात्रात पाणी सोडले जात आहे

या तालुक्यात जोरदार पाऊस बरसत असल्याने अंजनी धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून नदीपात्रात विसर्ग केल्याने अंजनी नदीसह नाल्यांना पूर आला आहे. विसर्गामुळे नदीला पूर आल्याने काठावरील गावे आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंजनी धरणात काही वर्षांपासून पाण्याचा अल्प साठा होता. मात्र यंदा अलीकडच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला. विशेष करून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण यंदा पूर्ण भरले आहे. यामुळे परिसरातील जनतेची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून याच्या आवर्तनाचा शेतकर्यांना आगामी काळात लाभ होणार आहे. दुसरीकडे सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात खरिपाची हानी झाल्याचेही दिसून येत आहे.







