मुंबई ( वृत्तसंस्था ) — राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार आहे भाजपचा उमेदवार आता अर्ज मागे घेणार आहे.

काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर आज संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेतील, असं जाहीर करण्यात आलंय. आज दुपारी ते विधीमंडळात जाऊन अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटलं होतं की, “आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”.







