अमरावती ( वृत्तसंस्था ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं उघडकीस आले आहे. आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना समन्स बजावला आहे.

विरेंद्र जगताप आणि उत्तरा जगताप यांना तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे 4 ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला झटका लागला आहे.
अमरावती जिल्हा बँकेत 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचे अहवाल मागविले होते. अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.







