जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा गांधीच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजण्यात आलेली आहे.

अभिनय हा त्यांच्या बालपणापासूनच आवडीचा विषय होता. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कला रुजविणे व महात्मा गांधीजींच्या विचारांच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 15 सप्टेंबरपर्यंत निःशुल्क नोंदणी व 20 सप्टेंबरपर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. पारितोषिक वितरण 2 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असे गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविले आहे.
5 ते 10 वी इयत्तेतील आणि 11 वी ते खुला गट अशा दोन गटातील स्पर्धेसाठी रोख पारितोषिके आहेत. पहिल्या गटासाठी प्रथम – 15,000, द्वितीय – 11,000, तृतीय – 7,000, आणि दोन उत्तेजनार्थ (प्रत्येकी 5, 000) रुपये असे पारितोषिके आहेत. दुसऱ्या गटासाठी पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे 21,000 (प्रथम), 15,000 (द्वितीय), 10,000 (तृतीय) आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देणार आहे.
एकपत्री अभिनय स्पर्धेसाठी गांधीजींचे जीवन, व्यक्तीमत्व, विचार, तत्त्व, कार्य, प्रेरक प्रसंग तसेच गांधीजींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेऊन एकपात्री नाट्य असावे इंग्रजी, हिंदी किंवा मराठी पैकी कोणत्याही एका भाषेत स्वतंत्र स्क्रिप्ट लेखन असावे. आक्षेपार्ह, राजकीय, जातीयता, सामाजिक तेढ निर्माण करणारी स्क्रिप्ट नसावी. लिखीत स्क्रिप्टनुसार एकपात्री नाट्याचे व्हीडीओ (चित्रण एमपी फोर) फॉरमॅटमध्ये करणे आवश्यक आहे. आधीच सोशल मीडियावर शेअर झालेले व्हीडीओ नसावे. स्पर्धेसाठीच खास बनविलेला व्हीडीओ असावा. एकपात्री नाट्य प्रयोग कमीत कमी 2 मिनिटे तर जास्तीतजास्त 5 मिनिटांचा असावा. वेशभूषा, रंगभूषा, संगीत इत्यादीचा प्रयोग करू शकतात परंतु तसे ते बंधनकारक नाही. संगीत, स्क्रिप्ट संवाद याबाबत कॉपीराईटची जबाबदारी स्पर्धकाची असेल. स्पर्धेसाठी स्वतंत्र निवड समिती आहे. निवड समितीला 60 टक्के गुण देण्याचे अधिकार असून उर्वरित 40 टक्के मूल्यांकन यूट्युब, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या लाईक्स् यावर विजेत्यांची निवड होईल. अंतिम निर्णय गांधी रिसर्च फाउंडेशनचा असणार आहे. 23 सप्टेंबरला व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड होतील. अपलोड व्हिडीओला 30 सप्टेंबर पर्यंत लाईक्स प्राप्त होतील व विजेत्या स्पर्धकांची 2 ऑक्टोबरला घोषणा व पारितोषिक वितरण होईल.
स्पर्धेसाठी नोंदणी व व्हिडीओ सादर करण्यासाठी http://www.gandhifoundation.net/GRF_EVT2021/login.php लिंक दिलेली आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या काळादरम्यान आयडी क्रमांक व पासवर्ड दिला जाईल. स्पर्धकाने त्याचा वैध इमेल आयडी व मोबाईल क्रमांक पुरवावा.







