पालकमंत्र्यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे मागणी

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी नागपूर येथील मिलिंद फुलपाटील यांची नियुक्ती राज्य शासनाने केली. मात्र या बदलीला स्थगिती द्यावी आणि डॉ जयप्रकाश रामानंद यांनाच पुन्हा कायम ठेवावे अशी मागणी जनमानसातून होऊ लागल्यामुळे तसेच शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजी निर्माण झाली. हे पाहता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शनिवारी २८ ऑगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खात्याचे मंत्री ना. अमित देशमुख यांना लेखी पत्र लिहून बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
गुरुवार २६ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी डॉ. मिलिंद फुलपाटील यांना अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार द्यावा अशा आशयाचे आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याने काढले. त्यासोबतच राज्यातील इतर दहा ते बारा अधिष्ठाता त्यांच्याबाबत देखील निर्णय जारी केले. अनेक ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात नाराजी उमटू लागली आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्यातील कारभारावर टीका होत आहे. जळगावात फक्त सव्वा महिन्याची कारकीर्द झाली असताना डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांची नियुक्ती आदेश जाहीर होताच एकच खळबळ जिल्ह्यात उडाली आहे. अनेक नगरसेवकांनी तसेच विविध संस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीद्वारे नाराजी व्यक्त करीत वैद्यकीय शिक्षण खात्याला ही बदली रद्द करण्याविषयी विनंती केली आहे.
जनतेच्या भावना लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सकाळी ११ वाजता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये खात्याचे मंत्री ना.अमित देशमुख यांना लेखी पत्र लिहून या बदलीला स्थगिती द्यावी व डॉ. जयप्रकाश रामानंद यांना कायम ठेवावे अशी मागणी केली आहे.
मंत्रिमंडळातील वजनदार कॅबिनेट मंत्री असलेले तसेच शिवसेनेचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे समजले जाणारे जळगावचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पत्राला अमित देशमुख हे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आशा असून सोमवारी याबाबत सुधारित आदेश निघू शकतात अशी माहिती मिळाली आहे.







