बीड (वृत्तसंस्था) – बँकेच्या पैशाच्या देवाणघेवाणवरून जन्मदात्या बापाचा मुलानेच खून केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेर गावात घडली आहे. जन्मदात्या बापाला मुलाने जबर मारहाण करून त्याचा खून केला त्यानंतर दुसरा लहान भाऊ आणि तीन चुलत्यांच्या मदतीने बापाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दारूच्या नशेत बाप महादेव औटे (वय – 55) यांना त्यांच्या मोठा मुलगा योगेश महादेव औटेने (वय – 32) याने रात्री साडेनऊ वाजता घरासमोर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर घरात झोपायला गेल्यावर झोपेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. योगेशने लहान भाऊ गणेश औटे, चुलते विष्णू बलभीम औटे, वाल्मिकी बलभीम औटे, परमेश्वर बलभीम औटे यांच्या मदतीने मध्यरात्री शेतात नेऊन बापावर अंत्यसंस्कार करत पुरावे नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन भाऊ व तीन चुलत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.







