प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांचे फलीत;सक्रीय रुग्णसंख्या आली ७७
जळगाव, – जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याचे फलीत म्हणून जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी सहा तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या शून्य असून उर्वरित नऊ तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या 77 पर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावासह रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होणे ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हावासियांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या 12 हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 12 हजारपर्यंत गेलेली सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून ती आता 77 पर्यंत खाली आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणची सक्रीय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी सहा तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे तर इतर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाचच्या आत आली असून एकमेव चाळीसगाव तालुक्यात ही रुग्ण संख्या 39 इतकी आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे रोखण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखली जळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका/नगरपरिषदा, पोलीस व महसुल प्रशासनासह आरोग्य व इतर शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना स्थानिक लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभत असून नागरीकांनी यापुढेही शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी यंत्रणांना सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या
जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, बोदवड या सहा तालुक्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या शून्य असून जळगाव शहर-8, जळगाव ग्रामीण-2, भुसावळ-7, अमळनेर-4, चोपडा-8, पाचोरा-2, भडगाव-1, यावल-2, चाळीसगाव-39, मुक्ताईनगर-4 असे एकूण 77 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 31 रुग्ण लक्षणे असलेले तर 46 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. यातील 15 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 8 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड-19 यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.