मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही पुरवठा केल्यानेच भाजपला मंत्रिपदासाठी चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे. त्यामुळे त्यांनी आमचे आभारच मानले पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टोलेबाजी केली. एकमात्र भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा राऊत यांनी काढला.
शिवसेनेला फटका देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. मंत्रिपदं ही देशाची सेवा करण्यासाठी दिली जातात. शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा विरोधकांना फटका देण्यासाठी मंत्रिपदाची खिरापत वाटली जात नाही. तसे असेल तर हा घटनेचा भंग आहे, असं सांगतानाच शिवसेनेला फटका देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. देशाचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं. त्या व्यक्तिचं योगदान पाहून मंत्रिपद दिलं जातं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चालला आहे. बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. मोदींनी पत्ते पिसले आहेत ते बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडलेला आहे. नक्कीच नारायण राणेंना मंत्री केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग असं खातं त्यांना दिलं. राणेंची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. अनेक पदं सांभाळली आहेत, असं सांगतानाच राणेंपुढे रोजगार वाढवण्याचं मोठं काम किंवा आव्हान आहे, असं राऊत म्हणाले.