मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. आता खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ खडसे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, असा आरोप करतानाच खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला.